वाटप नोंद कशी करतात? - How do the records allocate?

एकदा रमेश तलाठी कार्यालयात आला आणि त्याने तलाठी यांना त्याच्या कुटुंबात झालेल्या तोंडी वाटपानुसार गाव दप्तरी नोंद घेण्याची विनंती केली. त्यादिवशी मंडलअधिकाऱ्यांनी त्यांच्या मंडळातील सर्व नवीन तलाठ्यांना वाटप याच विषयावर प्रशिक्षणासाठी त्याच चावडीत बोलवले होते. रमेशची विनंती एकून त्यांनी रमेशलाही नवीन तलाठ्यांसह बसण्याची विनंती केली. मंडलअधिकाऱ्यांनी सांगायला सुरूवात केली.

वाटप नोंद कशी करतात? - How do the records allocate?

वाटपाच्या तीन पध्दती -

जमीनीचे वाटप म्हणजे जमीनीतील सहहिस्सेदारांमध्ये ज्याचे त्याचे क्षेत्र विभागून देणे. वाटप तीन पध्दतीने केले जाते.
  1. महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये वाटप
  2. दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत वाटप
  3. दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून वाटप.
या तिन्हीे प्रकारे वाटप करतांना जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि एकत्रीकरण अधिनियम 1947 च्या तरतूदींचे पालन केले जाते. म्हणजेच वाटप करतांना तुकडेबंदी-तुकडेजोड कायद्यात नमूद केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आकाराचा जमिनीचा तुकडा करता येत नाही.

वाटप फक्त जमिनीच्या सहहिस्सेदारांमध्येच करता येते. इतर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीच्या नावे वाटप करता येत नाही.

वाटप तोंडी केले जाऊ शकते. परंतु नंतर असे वाटप लेखी केले आणि ते कागदपत्र वाटपासंबंधी हिस्सा दर्शवित असतील आणि त्यामध्ये किफायतशीर हिस्सा असेल तर तो दस्त नोंदणीकृतच असावा अन्यथा तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही (ए.आय.आर.1988 सर्वोच्च न्यायालय, 881). याचाच अर्थ तोंडी आणि अनोंदणीकृत लेखी वाटपाला पुरावा म्हाणून कायदेशीर मान्यता नाही.

वाटप हे हस्तांतरण नाही. कारण वाटप हे जमीनीतील सहहिस्सेदारांमध्येच होते, ज्यांचा मुळत: त्या जमिनीत कायदेशीर मालकी हिस्सा असतोच. त्यांची मालकी काही नव्याने येत नाही. वाटपाने फक्त हिस्सा विभागला जातो. नागपुर खंडपीठ याचिका क्र. 2815/2003 मध्ये दिलेल्या निर्णयावर आधारीत परिपत्रकानुसार वाटपपत्र नोंदणीकृत असावे अशी सक्ती करु नये, अशा सूचना दिलेल्या आहेत. (शासन परिपत्रक क्रमांक- महसूल व वन विभाग, जमीन-07/2014/ प्र.क्र. 130/ज-1, दिनांक 16 जुलै 2014)

१. महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये वाटप -

Section 85 of the Maharashtra Revenue Act, 1966 - asskoperators
महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये वाटप तहसिलदारांसमोर केले जाते. असे वाटप करतांना सर्व सहहिस्सेदारांची संमती आवश्‍यक असते. सर्व सहहिस्सेदारांची संमती असल्यास फक्त जबाब घेऊन वाटप मंजूर केले जाते. यासाठी काहीही खर्च येत नाही.

२. दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत वाटप

दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत वाटप करतांना सर्व सहहिस्सेदारांची संमती आवश्‍यक असते. या वाटपासाठी रुपये शंभर मुद्रांक शुल्क देय असते. अशा वाटपात स्टॅंप पेपर, टंकलिखित वाटप पत्र, दुय्यम निबंधक कार्यालयाचे नोंदणी शुल्क यांसाठी थोडा खर्च येतो.

३.सहहिस्सेदारांमध्ये वाद असल्यास दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल -

If there is a dispute between the Sahasheshadars, then the allotment of the Divine Court
सहहिस्सेदारांमध्ये वाद असल्यास दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून न्यायालयामार्फत वाटप केले जाते. यासाठी दावा दाखल करुन त्याची नोंदणी करावी लागते, वादी, प्रतिवादींना नोटीस काढली जाते. वादी, प्रतिवादी आपापली कैफियत मांडतात, पुरावे सादर करतात. त्यानंतर न्यायालयाचा निकाल, दिवाणी प्रक्रिया संहिता 1908, कलम 54 अन्वये जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला जातो. जिल्हाधिकारी रितसर वाटपासाठी प्रकरण तहसिलदारांकडे पाठवतात. तहसिलदारांमार्फत प्रकरण भूमी अभिलेख कार्यालयाकडे वर्ग केले जाते. भूमी अभिलेख कार्यालय अर्जदाराकडून मोजणी शुल्क भरुन घेऊन मोजणी करतात. यानंतर वाटप तक्ता तयार करुन तहसिलदारांकडे पाठवला जातो. तहसिलदार सर्व संबंधितांना नोटीस बजावून, त्यांचे म्हणणे विचारात घेऊन वाटप मंजूर करतात.

वाचा : जमीन मोजणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे(Required Documents for Land Counting)

गैर पद्धतीने अडवणूक.

काही ठिकाणी आपसात नोंदणीकृत वाटप करुन घेतलेले असते. परंतु तो नोंदणीकृत दस्त नोंदविण्यास तलाठी नकार देतात व "फक्त महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 85 खाली तहसिलदारांसमोर झालेले वाटपच नोंदविण्याचे आम्हाला अधिकार आहेत, आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 85 खाली तहसिलदारांसमोरच वाटप करुन आणा,' असे खातेदारांना सांगतात. खरे तर आपसात केलेल्या नोंदणीकृत वाटपपत्राची नोंद घेण्यास काहीही अडचण नसते तरीही 85 चाच आग्रह धरला जातो. खातेदाराची अशी अडवणूक गैर आहे.

या सविस्तर माहितीमुळे सर्वांनाच वाटपाबाबतची संकल्पना कळण्यास मदत झाली.

(संदर्भ : महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966,कलम 85 ; दिवाणी प्रक्रिया संहिता 1908, कलम 54.)

SHARE THIS

0 टिप्पणी(ण्या):